लंघन – संकल्पना

आयुर्वेद हे अनादि-अनंत शास्त्र आहे. त्याच्या अनेक शाश्‍वत सिद्धांतांचा अभ्यास आपण आजपर्यंत केला आहे. हा आयर्वेद प्राचीन – ग्रंथोक्त असला तरीही आज संशोधन युगातही दुष्परिणामाचे ग्रस्त वैद्यकीय विश्‍व त्याच्याकडे आशेने बघत आहे.
रोजच्या जीवनात आपली जीवनशैली बदलवणारा आयुर्वेद बघताना आपल्यासमोर सध्याच्या ओबेसिटी लठ्ठपणा या ज्वलंत समस्येचा उपाय म्हणून आयुर्वेदाचा महत्त्वाचा सिद्धांत येतो- लंघन. उपाशी राहाणे, कमी खाणे एवढीच व्याप्ती नसलेली ही लंघन चिकित्सा कमीत कमी औषधे आणि अधिक रिझल्टस् देणारी आहे.
आयुर्वेदाने आठ प्रकारची माणसे निंदित – म्हणजे समाजात उपेक्षिली जाणारी अशी मानली आहेत. त्या व्यक्ती नेहमी रोगाने ग्रासलेल्या असतात, अल्प प्रतिकारशक्ती, सतत औषधे त्यामुळे कमी असणारे मनोबल असणार्‍या असतात.
यात सर्वाधिक आढळतात ते अस्तिस्थूल व अतिकृश व्यक्ती. यातही ग्रंथकार कार्श्य वरं स्थौल्यात् न हि स्थूलस्य भेषजनम् म्हणजेच बारीक व्यक्ती असणे हे कधीही जाड व्यक्तींपेक्षा बरे असते कारण लठ्ठपणाला औषध नाही. हा शाश्‍वत सिद्धांत सांगतात.
या तांत्रिक युगात – २१व्या शतकात ओबेसिटीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतात सर्वाधिक जाड माणसे पहायला मिळतात. विज्ञानाची प्रगती होऊनही लठ्ठपणावर ठोस औषधे व उपाय सापडलेला नाही.
याची चिकित्सा पहाताना लंघन ही संकल्पना ग्रंथकार सांगतात. लंघनाचे ८ प्रकार आपण रोजच्या व्यवहारात वापरून वजन नियंत्रित ठेऊ शकतो.
या उपायांपैकी वमन, विरेचन, नस्य आणि बस्ती हे उपाय पंचकर्मांमध्ये समाविष्ट असतात.
१) वमन – वमन म्हणजे औषधी तूप वाढत्या क्रमाने घेणे. सोबत स्नेहन स्वेदन घेणे व ३ ते ५ दिवसांनंतर उलटीचे औषध घेणे.
२) विरेचन – वरील ५ दिवसांप्रमाणे तूप, तेलाचा मसाज व वाङ्ग घेत तिसर्‍या किंवा पाचव्या दिवशी जुलाबाचे औषध घेणे.
३) बस्ती – तेल किंवा काढ्याचा एनिमा घेणे.
४) नस्य – तीक्ष्ण औषधी तूप किंवा तेल नाकात सोडले जाते.
या चार पंचकर्मांच्या उपायांमुळे वजन कमी तर होतेच, पण कर्मांच्या नंतर जो पश्‍चातक्रम सांगितला आहे त्याचे कडक पालन करावे लागते. वमन विरेचनानंतर खूप भूक लागते. अशावेळी पथ्याहार नाही सांभाळला, तर वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते.
५) क्षुधा निग्रह – भूकेला नियंत्रण करणे. तापामध्ये किंवा जुलाब होत असताना आपण गरम पाणी पिण्याचा सल्ला देतो यालाच लंघन म्हणतात. अशा वेळी वाढलेला अग्निदोष पचवतो व व्याधी बरी होऊ लागतो. स्थूल व्यक्तींमध्ये हाच अग्नि मेदाला पचवतो व वजन कमी करतो.
६) तृष्णा निग्रह – याचा अर्थ तहान लागली तरी पाणी न पिणे किंवा अल्प प्रमाणात घेणे. आयुर्वेदात उदर रोग (जलोदर) आणि सूज असताना पाणी कमी पिणे व इतर द्रव पदार्थ कमी घेण्याचा सल्ला देतात. आपण सध्या किडनीचे विकार असताना किंवा ङ्गिल्टरेशनचे काम बिघडले असताना पाणी पिण्यावर ऍलोपॅथी शास्त्रही मर्यादा घालते असे पहातो.
७) पाचन – न पचलेल्या आहाररसापासून अपक्व आम तयार होतो. त्यामुळे भूक मंदावते, शरीराला जडपणा येतो. संडासला चिकट होते. आहाररसाचे सम्यक पाचन होण्यासाठी, आमपाचक औषधांचा वापर करतात. रोज स्वयंपाक घरात वापरात येणारे सुंठ, आले, लसूण, जिरे, धने हे पाचक आहेत. सर्व मसाल्याचे पदार्थ उष्णवीर्याचे असल्याने आमपाचन करतात.
८) व्यायाम – व्यायाम करण्याने अग्नी प्रदीप्त होतो. भूक लागते आणि अन्नाचे पचन सुधारते. सामना जाऊन शरीराला हलकेपणा येतो. कोष्ठातील वात सरतो. त्यामुळे पोटही नीट साङ्ग होते. उत्साह वाढतो, मन प्रसन्न होते, वजन कमी करण्यामध्ये सर्वाधिक खात्रीचा आणि शाश्‍वत उपाय व्यायाम हाच आहे. डाएटिंग व भुलणारी झटपट औषधे यापेक्षा व्यायामाला सर्वाधिक रिझल्टस् मिळतात व त्याचा परिणाम टिकून रहातो.
स्थूल व्यक्तींना एरोबिक प्रकाराचा व्यायाम ङ्गायदेशीर ठरतो. मशिनवरील व्यायामामुळे शरीर डौलदार बनवले जाऊ शकते. पण त्यात सातत्य जरूरी असते.
९) मारून सेवा – म्हणजे हवा घेणे. मोकळ्या जागी वार्‍यात बसून शुद्ध हवा घेणे असा याचा अर्थ आहे. सकाळी ङ्गिरण्याचा किंवा टेकडी चढण्याचा व्यायाम केला की निसर्गाच्या सान्निध्यात प्राणवायू तर मिळतोच, पण ङ्गुफ्ङ्गुसाची क्षमता वाढते, मन प्रसन्न होते व प्रतिकारशक्तीही वाढते.
१०) आतप सेवा – आतप म्हणजे ऊन. कोवळ्या उन्हात बसण्यामुळे शरीराला हलकेपणा येतो व मेदसंचिती कमी व्हायला मदत होते. सध्या डी३ आणि व्हिटॅमिन डी यासाठी उन्हात बसणे अशीच उपचारपद्धती सांगितली जाते.
या चार शोधन सहा शमन प्रकारांनी लंघन चिकित्सा केली जाऊ शकते. कोणत्या रूग्णांसाठी कशा प्रकारचे लंघन हवे हे त्याचे वय, आजार, व्यवसाय, लिंग इ. पाहून वैद्य ठरवू शकतात. घरच्याघरी करता येण्यासारखे वजन कमी करण्याचे हे सोपे उपाय आपणही करून पाहू शकता.